जळते निखारे या काव्य संग्रहातून |
" कमाई "
दारूच्या नशेत तर्रर होवून
सायंकाळी हॉटेलात आला ' तो बाप ' ?
पोराचा दिवसभराचा रोजगार
रोजच्या प्रमाणे उकळण्यासाठी
नऊ वर्षाचा बच्चा हळहळला
त्याला वाटले...?
आपण दिवसभर राबायचे
हा येवून दारूत घालणार
आपली मेहनतीची ' कमाई '
घरची आठवली ती भाबडी बहिण
आणि तीन दिवसांची उपाशी आई
जर्जर आजाराने मृत्युशय्येवर
शेवटच्या घटका मोजत पहुडलेली
त्याने नकार दिला ' कमाई ' देण्यासाठी
पण अचानक
क्रुद्ध बापाच्या रक्तातील दारू
उसळून निघाली संतापाने
येवढ्यात जोरदार दगड पडला
त्या कोवळ्या जीवाच्या मस्तकात
आणि जीवन नावाची ' कमाई '
उधळली गेली मृत्युच्या दुकानात
आणि दारू पुन्हा सरस ठरली
बेगडी नैतिकतेच्या बाजारात
हमेशा सारखी..................
-आनंद गुंडीले
No comments:
Post a Comment